संगमेश्वर मध्ये विशाल कांबळे हस्तकलेतून साकारतात देव-देवतांचे रूप; काळ्या पाषाणातून मूर्तीची निर्मिती, गोळवली टप्पा येथे शिल्प पाहण्याची संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आधुनिक यंत्रसामग्रीच्या हायटेक युगात हातकलेचे महत्त्व कमी होत चालल्याचे चित्र असताना, कोल्हापूर जिल्ह्यातील विशाल कांबळे यांनी मात्र आपल्या कलेच्या जोरावर दगडालाही जिवंतपणा दिला आहे. गेली काही वर्षे मुंबई-गोवा महामार्गावरील गोळवली टप्पा येथे वास्तव्यास असलेले कांबळे हे हस्तकलेतून देवी-देवतांच्या आकर्षक मूर्तींसह विविध गृहउपयोगी वस्तू साकारत आहेत.

निसर्गाने दिलेल्या चौसष्ट कलांपैकी एक कला जरी आत्मसात केली, तरी ती कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन बनू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे विशाल कांबळे. ओबडधोबड दगडांना आपल्या हातातील कौशल्याने आकार देत त्यांनी आतापर्यंत हजारो मूर्ती घडविल्या आहेत.

कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द या जोरावर विशाल कांबळे चार वर्षांपूर्वी कोकणात आले. वडिलांकडून मिळालेल्या पाषाण शिल्पकलेच्या वारशाला त्यांनी व्यवसायाचे रूप दिले. सुरुवातीच्या काळात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अनेकदा काम करताना हाताला, बोटांना जखमा झाल्या; मात्र त्यांनी हार मानली नाही. आपल्या कलेवर असलेला विश्वास आणि चिकाटी यांच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

आज त्यांच्या हस्तकलेतून साकारलेल्या श्रीगणेश, दुर्गा, खंडोबा, महाकाली, हनुमान आदी देवी-देवतांच्या मूर्तींना मोठी मागणी आहे. मार्बल, पांढरा, काळा दगड अशा विविध प्रकारच्या पाषाणातून ते आकर्षक मूर्ती घडवितात.मुंबई-गोवा महामार्गालगत दगडावर घनाचा घाव घालताना दिसणारे कांबळे केवळ मूर्तीच नव्हे, तर दगडी जाते, उखळ, खलबत्ता, पाटा-वरवंटा अशा विविध गृहउपयोगी वस्तूही तयार करतात. परिसरातील मंदिरांसाठी लागणाऱ्या मूर्ती तसेच पूर्वजांचे पुतळे बनविण्यासाठीही त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मागणी असते.

या पारंपरिक व्यवसायात त्यांना कुटुंबीयांचीही साथ लाभत आहे. मुलगा, उच्चशिक्षण घेणारी मुलगी आणि पुतण्या हे सर्व जण गावाकडे या कामात मदत करतात.शिक्षणासोबतच कुटुंबाच्या व्यवसायात हातभार लावत पुढे प्रगती करण्याचे त्यांचे स्वप्न असल्याचे कांबळे यांनी सांगितले.हस्तकलेच्या बळावर उभा राहिलेला हा संघर्ष आणि यशाचा प्रवास आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.