
स्लीपर बस केमिकल वाहून नेणाऱ्या ट्रकला धडकल्याने अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 30 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील पिनान भागातील चॅनल 100 इंटरचेंज पुलाजवळ मंगळवारी सकाळी ही घटना घडली. अपघातात बसचालक, लहान मूल आणि महिलेसह चौघांचा मृत्यू झाला.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, अपघातग्रस्त स्लीपर बस इंदूरहून दिल्लीला चालली होती. बस वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस ट्रकला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. यात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव व मदतकार्य वेगाने केले. जखमींना पिनान येथील आदर्श सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर गंभीर जखमी प्रवाशांना इतर प्रमुख रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले.
अतिवेग आणि निष्काळजीपणा यामुळे ही अपघाताची घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अपघातानंतर द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

























































