श्रीवर्धनच्या रोठा सुपारीचे अस्तित्व धोक्यात, पर्यटन व्यवसायासाठी बागांच्या जागेवर इमले; संशोधन केंद्रही रखडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशासह जगात प्रसिद्ध असलेल्या श्रीवर्धनमधील रोठा सुपारीचे अस्तित्व आता पूर्णपणे धोक्यात आले आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे सुपारीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. तालुक्यात पर्यटन व्यवसाय दिवसेंदिवस वाढत चालला असल्याने स्थानिक नागरिक सुपारी आणि नारळाच्या बागा तोडून त्या ठिकाणी पर्यटकांसाठी इमले उभे करत आहेत. श्रीवर्धनमधील रोठा सुपारी चांगली विकसित व्हावी, शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करून सुपारीचे उत्पादन चांगले घेता यावे, यासाठी दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र दोन वर्षांनंतरही या केंद्राच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे जगप्रसिद्ध सुपारीचे भवितव्य धोक्यात आले आहे.

दोन वर्षांपूर्वी खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, विधान परिषद सदस्य अनिकेत तटकरे तसेच दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. सुमारे पाच एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या संशोधन केंद्रातून जिल्ह्यातील सुपारी उत्पादकांना संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, रोग व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र हे केंद्र अद्यापपर्यंत उभे न राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या शेतीत सुपारी उत्पादन आता कमी निघू लागल्याने शेतकरी सुपारीपासून लांब जाऊ लागले आहेत

निधी उपलब्ध झाल्यानंतर काम सुरू

सध्या प्राप्त असलेल्या अनुदानातून या खरीप हंगामापासून सुरुवातीला सुपारी पिकांची लागवड, शेततळे, विहीर आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासोबतच कार्यालयीन इमारत आणि शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी अंतिम मंजुरीचे प्रस्ताव संबंधित प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या निधीनुसार बांधकामाची कामे टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील, अशी प्रतिक्रिया दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांनी व्यक्त केली.

भौगोलिक मानांकनासाठी केंद्र महत्त्वाचे

श्रीवर्धनची ओळख असलेल्या प्रसिद्ध रोठा सुपारीला भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी तसेच नारळ-सुपारी पिकांच्या लागवडीला पुन्हा चालना देण्यासाठी हे सुपारी संशोधन केंद्र लवकरात लवकर सुरू होणे अत्यावश्यक आहे, अशी प्रतिक्रिया दिवेआगर येथील शेतकरी विरेंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.