IPL 2026 – निवडणुकांचा फटका आयपीएलला; दोन सामन्यांची फिरवाफिरवी… अहमदाबादचा चेन्नईला चेन्नईचा अहमदाबादला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलच्या  नव्या हंगामाला निवडणुकांचा थेट फटका बसला असून बीसीसीआयने वेळापत्रकात मोठा बदल करण्याचा तातडीचा निर्णय घेतला आहे. गुजरातमधील अहमदाबाद आणि इतर भागांत 26 एप्रिल रोजी होणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकांमुळे चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील दोन महत्त्वाच्या सामन्यांचे स्थळ बदलण्यात आले आहे. नव्या बदलानुसार अहमदाबादचा सामना चेन्नईला आणि चेन्नईचा सामना अहमदाबादला फिरवण्यात आला आहे.

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 26 एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये होणारा दुपारचा सामना आता चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दुपारी साडेतीन वाजता सुरू होणारा हा सामना आता चेपॉकच्या मैदानावर रंगणार असून स्थान बदलले तरी दोन्ही संघांतील चुरस तशीच कायम राहील. याचबरोबर 21 मे रोजी चेन्नईत होणारा सामना आता अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर हलवण्यात आला आहे. हा सामना सायंकाळी साडेसात वाजता खेळवला जाणार आहे.

बीसीसीआयने स्पष्ट केले की, 26 एप्रिल रोजी गुजरातमध्ये होणार्या निवडणुकांमुळे सुरक्षा आणि व्यवस्थापनाच्या कारणास्तव हा बदल करणे अपरिहार्य होते. त्यामुळे आयपीएलसारख्या भव्य स्पर्धेलाही निवडणुकांच्या वेळापत्रकानुसार आपली पावले उचलावी लागली आहेत. मैदान बदलले, शहर बदलले, पण चेन्नई सुपरकिंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील टक्कर मात्र तितकीच तुफानी राहणार आहे. आता चेपॉक आणि नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणाऱ्या या लढतींमध्ये कोण वरचढ ठरणार, याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.