मुंबईत भटक्या कुत्र्यांची दहशत, 1 लाख 35 श्वानांच्या नसबंदीसाठी पालिका करणार 23 कोटींचा खर्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून विविध उपाययोजना केल्या जात असताना भटक्या कुत्रांची दहशत कायम असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी पालिका पुढील तीन वर्षांत 1 लाख 35 हजार कुत्र्यांची नसबंदी करणार असून यासाठी 22 कोटींचा खर्च करणार आहे. भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी परळ येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयासह इतर 9 संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबईत भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः रात्री भटक्या कुत्र्यांची दहशत आणखी वाढते. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून 994 पासून भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी तत्त्वावर प्राणी जनन नियंत्रण (श्वान) कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सन 1998 पासून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा कार्यक्रम अशासकीय संस्थांच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे. तेव्हापासून ऑगस्ट 2025 पर्यंत एकूण 4 लाख 34 हजार 529 भटक्या श्वानांची नसबंदी करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाऱया स्थायी समितीच्या बैठकीत मांडला जाणार आहे.

अशी आहे भटक्या कुत्र्यांची संख्या

2024 नुसार भटक्या कुत्र्यांची संख्या  – 90,757. यातील नसबंदी झालेल्या श्वानांची संख्या ः 33, 671.

नसबंदी न झालेल्या नर आणि मादी श्वानांची संख्या- (नर 22,447, मादी 11,224). भविष्यात वाढल्या जाणाऱया श्वानांची संख्या- 4,48,947

या संस्थांना नसबंदीचे काम

द वेल्फेअर ऑफ स्ट्रेडॉग्ज-महालक्ष्मी

दि बॉम्बे सोसायटी फॉर प्रिव्हेंन्शन ऑफ क्रुएल्टी टू ऑनिमल, परळ

इन डिफेन्स ऑफ ऑनिमल, देवनार

अहिंसा संस्था, मालाड

उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशन, मुलुंड

मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ

यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ऑनिमल

वेटर्नली थेरपेटिक्स एंडोसर्जरी अँड मेडिसिन सोसायटी, मुलुंड

युनिव्हर्सल ऑनिमल वेल्फेअर सोसायटी, मालाड