स्वयंचलित दरवाजांची नॉन-एसी लोकल अखेर मुंबईत आली! चेन्नईतून थेट कुर्ला कारशेड, सुरुवातीला कमी गर्दीच्या मार्गावर धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकल ट्रेनच्या गेटवर होणारी गर्दी आणि त्यात प्रवासी खाली पडून सुरू राहिलेले मृत्यूचे तांडव थांबविण्यासाठी अखेर मध्य रेल्वेने ठोस पाऊल उचलले आहे. चेन्नईच्या ‘आयसीएफ’ फॅक्टरीत तयार झालेली देशातील स्वयंचलित दरवाजांची पहिली नॉन-एसी लोकल सोमवारी कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली. पुढील काही दिवस गाडीची तांत्रिकदृष्टय़ा तपासणी केली जाणार असून त्यानंतर कमी गर्दीच्या मार्गावर ही गाडी प्रवासी सेवेत धावणार आहे. या लोकलमुळे अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होणार आहे.

चेन्नईतील आयसीएफ फॅक्टरीत विशेष रचना व आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेली देशातील पहिली नॉन-एसी लोकल ट्रेन तयार करण्यात आली. 12 डब्यांची ही लोकल सोमवारी सायंकाळी कुर्ला कारशेडमध्ये दाखल करण्यात आली. या गाडीमध्ये 1600 हून अधिक प्रवासी बसण्याची क्षमता असून अधिक प्रवाशांना उभे राहण्यासाठी मोकळी जागा ठेवण्यात आली आहे. या लोकलची तांत्रिकदृष्टय़ा टप्प्याटप्प्याने विविध चाचण्या केल्यानंतर कमी गर्दीच्या उरण भागातील पोर्ट मार्गावर प्रवासी सेवेची चाचणी करण्यात येणार आहे. नंतर मेन लाईनवरील प्रवासी सेवेत ही लोकल धावेल, असे रेल्वे अधिकाऱयांनी सांगितले.