
गावदेवी जत्रेसाठी बकरा देण्यास नकार देणाऱ्या कुटुंबावर सातजणांच्या टोळक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले असून त्यामधील एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान परिसरात आशिष दळवी यांचा तबेला असून त्यांच्या बकऱ्या व म्हशी आहेत. सध्या परिसरात गावदेवीची जत्रा सुरू असल्याने बकऱ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास सुजल भोसले हा तरुण दळवी यांच्या तबेल्यात बकरा घेण्यासाठी आला होता. मात्र त्यावेळी आशिष दळवी यांनी सकाळी या असे सांगत बकरा देण्यास नकार दिला. त्यावरून संतापलेला भोसले काही वेळातच आपल्या साथीदारांसह पुन्हा तबेल्याकडे परतला. रिक्षा आणि चारचाकी वाहनातून आलेल्या या सातजणांनी दळवी व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला चढवला. त्यांनी लाथाबुक्क्यांनी व मारहाणीने दळवी कुटुंबाला गंभीर जखमी केले. या घटनेत आशिष दळवी, त्यांची आई व भाऊ जखमी झाले असून त्यांची आई गंभीर जखमी आहे.
परिसरात तणाव
घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच विष्णुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी सुजल भोसले, विनय हेगडे, प्रमोद ठाकरे, यज्ञेश खंडागळे, अक्षय खंडागळे यांच्यासह अन्य दोन जणांविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


























































