
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील चनई बुज-खैरगाव मार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. हातलोणी येथील नागरिक लग्नकार्य आटोपून पिकअप वाहनाने परत येत असताना गाडीसमोर अचानक रानडुकरांचा मोठा कळप आडवा आला. या डुकरांना वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक ब्रेक मारल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप रस्त्याच्या मधोमध उलटली. या अपघातात एकूण 12 जण जखमी झाले असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. गंभीर जखमींना तातडीने चंद्रपूर येथे हलवण्यात आले असून उर्वरित जखमींवर कोरपना ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे अशा अपघातांची भीती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
























































