
धारावी धोबी घाट येथील जुना पादचारी पूल रेल्वे प्रशासनाने सोमवारपासून कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता रहदारीसाठी अचानक बंद केला. नवीन पुलाच्या बांधकामासाठी धोकादायक एमसीजीएम / रेल्वे पादचारी पूल 13 एप्रिलपासून बंद केला जाईल. त्यामुळे प्रवाशांनी सायन-माटुंगा बाजूच्या पुलाचा वापर करण्याचे आवाहन सूचना फलकाच्या माध्यमातून प्रशासनाने केले होते. अचानक पूल बंद केल्यामुळे स्थानिकांची आणि प्रवाशांची मोठी फरफट झाली. अनेकांना लांबचा वळसा घ्यावा लागला तर काहींनी रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास केला. ही बाब लक्षात येताच शिवसेनेने घटनास्थळी धाव घेत जनआंदोलन करत प्रशासनाचा जोरदार निषेध केला आणि रेल्वे व महापालिकेचा डाव उधळून लावला. या वेळी विभाग संघटक माजी नगरसेवक विठ्ठल पवार, नगरसेवक टी.एम. जगदीश, नगरसेविका अर्चना शिंदे, शाखाप्रमुख मनी पंडन, महिला शाखा संघटक चंद्रा द्विवेदी, उपविभाग समन्वयक सुरेश जाधव यांच्यासह शिवसैनिक व स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


























































