Mumbai News – किरकोळ वादातून सुरक्षारक्षकाला भोसकले; आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किरकोळ वादातून सुरक्षारक्षकाची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. अभिनव चौधरी (56) असे मयत सुरक्षारक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी खेरवाडी पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येनंतर आरोपीने पलायन केले. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मयत चौधरी मूळचा बिहारचा रहिवासी असून वांद्रे येथे एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. सोमवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास कर्तव्यावर असताना आरोपीने किरकोळ वादातून चौधरीवर हल्ला केला. यात चौधरी याच्या मान आणि हातावर गंभीर जखमा झाल्या. जखमी अवस्थेत चौधरीला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

फोन कॉलला प्रतिसाद न दिल्याने चिडलेल्या आरोपीने चौधरीवर चाकूने हल्ला केला असावा, असा प्राथमिक अंदाज खेरडवाडी पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी भाभा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याआधारे आरोपीची ओळख पटल्याचे समजते. संशयित आरोपीला पकडण्यासाठी सध्या शोधमोहीम सुरू आहे.