Noida Protest – नोएडा हिंसाचाराचे ‘पाकिस्तानी कनेक्शन? उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा, तपासाला वेग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील फेज-2 परिसरामध्ये पगाववाढ आणि अन्य प्रलंबित मागण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाने सोमवारी हिंसक वळण घेतले. नोएडामधील 80 हून अधिक ठिकाणी सुमारे 40 हजार कामगार रस्त्यावर उतरल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी हजारो संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड करत काही वाहने पेटवून दिली आहेत. यासोबत पोलिसांसोबत झटापटीच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे कामगार मंत्री अनिल राजभर यांनी या हिंसाचारामागे एक मोठे षडयंत्र असण्याची शक्यता वर्तवली आहे.

सोमवारी नोएडातील परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले. मात्र या आंदोलनात सहभागी झालेल्या बाहेरच्या काही गटांनी जाणीवपूर्वक तणाव निर्माण केला. त्यामुळे आंदोलन आणखी पेटले, अशी माहिती पोलीस आयुक्त लक्ष्मी सिंह यांनी दिली.पोलिसांनी आतापर्यंत 300 हून अधिक जणांना अटक केली असून 100 हून अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने इतर आंदोलकांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच सध्या पोलीस आणि प्रशासन अधिक सतर्क झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संवेदनशील भागात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान आता या संपूर्ण प्रकरणाला गंभीर वळण लागले असून, उत्तर प्रदेशचे कामगार मंत्री अनिल राजभर यांनी या हिंसाचारामागे बाह्यशक्तींचा हात असण्याची शक्यता वर्तवली आहे. यांच्या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीच  मेरठ आणि नोएडा भागातून चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. यांच्या चौकशीदरम्यान आरोपींचा थेट संबंध पाकिस्तानशी असल्याची शक्यता तपासली जात आहे. त्यामुळे राज्यातील विकासकामात अडथळा आणण्यासाठी आणि अस्थिरता निर्माण करण्यासाठी हा एक ‘नियोजित कट’ असावा, असा संशय वर्तवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुजफ्फरनगरमधील कार्यक्रमात व्यत्यय आणण्याच्या उद्देशाने या देशविरोधी शक्तींनी हिंसाचार घडवून आणला असावा, असा आरोप मंत्र्यांनी केला आहे. या तणावपूर्ण वातावरणात कामगारांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. हिंसाचार हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही, सरकार कामगारांच्या मागण्या ऐकून घेण्यास तयार आहे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी शांतता राखावी आणि पोलिसांना तपासात सहकार्य करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

पगारवाढ मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लाठीमार, नोयडाच्या फेज-2 औद्योगिक क्षेत्रातील घटना