असाधारण! बेहतरीन!! आशाताईंच्या आठवणींनी गझलसम्राट गुलाम अली भावुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘आशाताई केवळ असाधारण कलाकार होत्या असं नव्हे, तर माणूस म्हणून त्या ‘बेहतरीन’ होत्या. त्या किती महान होत्या हे सर्वांनाच माहीत आहे. मी वेगळं काय सांगणार? त्यांना जन्नत मिळो एवढीच दुवा मी अल्लाहकडे करतो…’

हे उद्गार आहेत पाकिस्तानचे दिग्गज गझल गायक गुलाम अली यांचे. आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त कळताच फेसबुकवर व्हिडीओ शेअर करून गुलाम अली यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगताना ते भावुक झाले. ‘आशाताई प्रत्येक कलाकाराचा आदर करायच्या. सोबतच्या कलाकाराकडून जास्तीत जास्त चांगलं काम कसं होईल यासाठी त्या प्रयत्न करायच्या. त्याला प्रोत्साहन द्यायच्या. मला आणि माझ्या मुलाला त्यांच्यासोबत काम करायला मिळालं हे माझं भाग्य समजतो. त्या खूपच प्रेमळ होत्या. त्यांच्यासोबत रेकॉर्डिंग करताना मला कधी परकेपण वाटायचं नाही. मी त्यांच्या कुटुंबातलाच कोणीतरी आहे इतका सहज त्यांचा वावर असायचा. त्यांनी नेहमी मला घरच्यासारखं प्रेम दिलं. त्यांचं प्रेम आणि आपुलकी कधीच विसरणार नाही, असे गुलाम अली म्हणाले.

‘अत्यंत कठीण गाणीही त्या सहज गाऊन जायच्या. मात्र त्यात कुठेही आविर्भाव नसायचा. एकदा त्या मला म्हणाल्या, तुम्ही खूप कठीण बनवलं आहे. मात्र, नंतर त्यांनी ज्या पद्धतीनं ते गायलं ते ऐकून सगळे मंत्रमुग्ध झाले,’ असे गुलाम अली यांनी सांगितलं. एका रेकार्डिंगच्या वेळी त्यांनी मला स्वतःच्या हाताने जेवण बनवून खाऊ घातल्याची आठवणही गुलाम अली यांनी सांगितली.

– ‘आशाताईंनी संगीताला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. असे कलाकार शतकातून एकदा जन्माला येतात. त्यांच्या स्वरात जादू होती. तो स्वर लोकांच्या मनात कायम जिवंत राहील. अल्लाह त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.’