भाजप, आरएसएसचा मतचोरीत सहभाग; त्यांची द्वेषपूर्ण विचारसरणी लोकशाही नष्ट करतेय, राहुल गांधी यांचे टिकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मतचोरीमध्ये सहभाग असून त्यांची द्वेषपूर्ण विचारसरणी लोकशाही नष्ट करत आहे, असा जबरदस्त हल्लाबोल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील रायगंज येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजप, आरएसएसवर जोरदार हल्ला चढवला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडीत नेहरू यांनी देशाला संविधान दिले. परंतु आज भाजप, आरएसएसची द्वेशाने भरलेली विचारसरणी संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप, आरएसएसचे लोक थेट संविधानावर हल्ला करत नाहीत, तर घटनात्मक संस्थांमध्ये आपली माणसं बसवून आणि मत चोरी करून देशाचे संविधान आणि लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

आमची लढाई भाजप, आरएसएसच्या द्वेषपूर्ण विचारसरणीसोबत आहे. ‘भारत जोडो’ यात्रेत आम्ही कन्याकुमारीपासून ते कश्मीरपर्यंत आम्ही 4 हजार किलोमीटर चाललो. आम्ही संपूर्ण देशाला संदेश दिला आहे की द्वेष, हिंसा आणि विभाजन यामुळे काहीही साध्य होणार नाही. प्रेम आणि एकतेनेच हा देश पुढे जाईल, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये एसआयआरनंतर 90 लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहे. यावरूनही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार यादीतून नावे वगळणे असंवैधानिक आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

नरेंद्र मोदी देशभक्त नसून देशद्रोही आहेत. मोदी अमेरिकेसोबत करार करून हिंदुस्थानला विकण्याचे काम केले आहे. तुमचा नेता विकला गेला आहे, असे मी संसदेत म्हणतो तेव्हा भाजपचा एकही खासदार उत्तर देऊ शकत नाही. कारण सर्वांना माहिती आहे की, नरेंद्र मोदी यांना डोनाल्ड ट्रम्प कंट्रोल करत आहेत, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला.