पाच दिवस घरातच होता मृतदेह,अंत्यविधींसाठी शेजाऱ्यांनीही फिरवली पाठ; हतबल झालेल्या भावाने घरातच दिला बहिणीला अग्नी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटाना घडली आहे. गोविंदपूर येथील वास्तुविहार कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, मृत्यूनंतर पाच दिवस तिचा मृतदेह घरातच पडून होता. तिचे अंतिम संस्कार करण्यासाठी तिच्या भावंडानी शेजाऱ्यांची मदत मागितली. मात्र शेजाऱ्यांनी कोणतीही मदत न केल्याने त्यांनी बहिणीचा मृतदेहाला बाथरूममध्ये अग्नी दिली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लिपिका कुमारी असे या तरूणीचे नाव होते. लिपिकाचा घटस्फोट झाला होता. यानंतर 2023 मध्ये तिच्या वडिलांच्या निधन झाले. त्यामुळे लिपिकाला मानसिक धक्का बसला होता. वडिलांच्या निधनानंतर लिपिका आणि तिचा भाऊ दोघेच घरात राहायचे. दरम्यान 8 एप्रिल रोजी घरातच लिपिकाचा संशयास्पद मृत्यू झाला. लिपिकाचा मृत्यू झाल्यानंतर तिचा भाऊ प्रणव याने अंत्यसंस्कारासाठी शेजाऱ्यांकडे वारंवार मदतीची याचना केली. मात्र, एकाही शेजाऱ्याने मदतीचा हात पुढे केला नाही किंवा साधी विचारपूसही केली नाही.

शेजाऱ्यांच्या या वागळ्यामुळे हतबल झालेल्या प्रणवने शेवटी घराच्या बाथरूममध्येच बहिणीवर अंत्यसंस्कार करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. त्याने घरातील कपडे, चादर आणि उशांच्या साहाय्याने बाथरूममध्येच मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. बाथरूममधून येणारा धूर आणि दुर्गंधीमुळे शेजाऱ्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली आणि मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेतले. घराची भयानक अवस्था पाहून पोलीसही थक्क झाले. पोलिसांनी घटनेचा तपास करण्यास सुरूवात केली. लिपिका आणि तिचा भाऊ दोघेही दीर्घकाळापासून मानसिक नैराश्यात होते, ज्यामुळे त्यांनी कोणाशीही कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवला नव्हता. या भावंडांनी स्वतःला समाजापासून लांब ठेवल्याचे पोलीस तपासातून समोर आले. सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून नातेवाईकांचे कॉल रेकॉर्ड्स तपासले जात आहे.