मणिपूरच्या विष्णुपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला; 21 जण जखमी, दोन वाहने जाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूरच्या विष्णुपूर जिल्ह्यात पुन्हा हिंसाचार उफाळून आला. साध्या वेशातील सशस्त्र सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या तीन वाहनांना आंदोलकांनी अडवल्यानंतर संघर्ष पेटला. या संघर्षात 21 नागरिक जखमी झाले असून, पाच आंदोलकांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी दुपारी साधारण दीडच्या सुमारास, विष्णुपूर जिल्ह्यातील थिनुंगेई जवळून जात असताना चुकीच्या अफवांमुळे स्थानिक लोकांनी सुरक्षा दलाच्या कामात अडथळा आणला. या वाहनांमध्ये कुकी सशस्त्र दहशतवादी असल्याची चुकीची अफवा पसरल्याने स्थानिक जमावाने ही वाहने अडवली. नागरिकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड करत दोन वाहने पेटवून दिली. यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली, असे पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याने आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. यात किमान 21 आंदोलकांना किरकोळ दुखापती झाल्या असून, पाच आंदोलकांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 अन्वये, सायंकाळी 5 वाजल्यापासून पुढील आदेश मिळेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.