
रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशी नागरिकांना घेऊन जाणारी बोट अंदमानजवळ समुद्रात उलटल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 250 हून अधिक जण बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली. यात लहान मुलांचाही समावेश आहे. या नौकेतून सुमारे 280 लोक प्रवास करत होते, असे प्राथमिक अहवालात म्हटले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ही बोट 4 एप्रिल रोजी दक्षिण बांगलादेशातील टेकनाफ येथून मलेशियाच्या दिशेने निघाली होती. सोसाट्याचा वारा, खवळलेला समुद्र आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी यामुळे अंदमानच्या समुद्रात ही बोट बुडाल्याचे वृत्त आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित उच्चायुक्तांनी (UNHCR) एका निवेदनात म्हटले आहे.
परदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष आणि अनेकदा तस्करी करणाऱ्या टोळ्यांकडून पसरवली जाणारी चुकीची माहिती यामुळे रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक मोठे धोके पत्करण्यास प्रवृत्त होतात. ही घटना दीर्घकाळ चाललेल्या विस्थापनाचे गंभीर परिणाम दर्शवते, असे UNHCR आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेने म्हटले आहे.


























































