दिवा-मुंब्रातून चार अल्पवयीन मुले बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणे, दिवा व मुंब्रा या परिसरातून चार अल्पवयीन मुले व मुली बेपत्ता झाल्या असून वेगवेगळ्या कारणांमुळे ही मुले घर सोडून गेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत.

दिवा परिसरातील एका घटनेत 16 वर्षीय मुलगी घरातून मोबाईल दुरुस्तीसाठी जात असल्याचे सांगून बाहेर पडली मात्र त्यानंतर ती परतली नाही. तिचा मोबाईल बंद अवस्थेत असल्याने संपर्क होऊ शकलेला नाही. कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतल्यानंतरही ती सापडली नसल्याने डायघर पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. मुंब्रा येथील दुसऱ्या घटनेत 17 वर्षीय मुलगी पहाटेच्या दरम्यान घरातून कुणालाही न सांगता निघून गेल्याचे समोर आले आहे. संबंधित मुलगी मोबाईलवर चॅटिंग करत असल्याने काही दिवसांपूर्वी तिचा मोबाईल काढून घेतला होता. त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली.

मुंब्रा-दिवा येथून आणखी एका प्रकरणात 14 वर्षीय मुलगा वाईट संगत व नशेच्या सवयीमुळे घरच्यांनी रागावल्यानंतर घरातून पळून गेला. कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला मात्र तो अद्याप सापडलेला नाही. तसेच बाहेरगावीहून ठाण्यात आलेल्या 17 वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याचीही घटना समोर आली आहे. संबंधित मुलगी नातेवाईकांकडे राहत असताना सायंकाळच्या सुमारास घरातून निघून गेल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.