
अमेरिका, इस्रायल इराण युद्धामुळे जागतिक शेअर बाजारात दबाव होता. अमेरिका-इराणमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर शेअर बाजाराने उसळी घेतली होती. मात्र, दोन्ही देशातील शांतता चर्चा अयशस्वी ठरल्याने बाजाराने पुन्हा गटांगळ्या घेतल्या होत्या. आता आखातात शांततेचे संकेत मिळथ असल्याने शेअर बाजाराने चांगलीच झेप घेतली आहे.
शेअर बाजारात व्यवहाराला सुरुवात होताच बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ११२० अंकांनी वधारला, निफ्टी २४२०० च्या जवळ पोहचला. आयटी, मेटल स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. बुधवारी सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार तेजी दिसून आली. सकाळी ११:१० वाजता, सेन्सेक्स १,१०५ अंकांनी वाढून ७७,९५३ वर होता, तर निफ्टी ३४४ अंकांनी वाढून २४,१८७ वर होता. तर १२.५० वाजता सेन्सेक्स 1233.85 अंकांच्या वाढीसह म्हणजेच1.61 टक्के वाढून 78,097.95 वर व्यवहरा करत होता. तर निफ्टी 388.25 अंकांच्या म्हणजेच 1.63% वाढीसह 24,233 . 70 वर व्यवहार करत होता.
आखातातील शांततेच्या संकेतांमुळ बाजारातील अस्थिरता मोठ्या प्रमाणात कमी झाली. बाजार मजबूत मर्यादेत आला. आता बाजाराने ओलांडलेल्या 24000 टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या तेजीमुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. इंडिया विक्समध्ये ९ टक्क्यांची घसरण झाल्याने गुंतवणूकदारांची भीती कमी झाल्याचे दिसत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतही घसरण झाल्याने बाजारात तेजी कायम राहण्याची शक्यता आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा पुन्हा सुरू होण्याच्या आशेवर आज शेअर बाजारात बुधवारी तेजी आली आहे.
या वाढीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ९.२५ लाख कोटींनी वाढून ४५७.७३ लाख कोटींवर पोहोचले. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. सेन्सेक्समधील सर्व ३० शेअर्स वाढीसह उघडले. इंडिगोमध्ये सर्वाधिक ४% ची वाढ दिसून आली. अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, लार्सन अँड टुब्रो, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, कोटक बँक आणि एसबीआय यांच्या शेअर्समध्येही लक्षणीय वाढ दिसून आली. दरम्यान, भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ०.२ टक्क्यांनी वधारून ९३.१७ वर उघडला. मागील सत्रात तो ९३.३७५० वर बंद झाला होता.
आज व्यापक बाजारातही लक्षणीय वाढ दिसून आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की इराण युद्ध समाप्तीच्या जवळ आले आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, इराण करार करण्यास उत्सुक आहे, तर पश्चिम आशियामध्ये विविध आघाड्यांवर राजनैतिक प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा चर्चा सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.
आशियाई बाजारपेठांची सुरुवातही आज तेजीने झाली. जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियामधील तेजीच्या जोरावर MSCI आशिया पॅसिफिक निर्देशांक ०.९% ने वधारला. मागील सत्रात यूएस S&P 500 १२% वाढीसह बंद झाला, ज्यामुळे तो जानेवारी महिन्याच्या अखेरीस गाठलेल्या उच्चांकाच्या जवळ पोहोचला. टेक स्टॉक्सचा समावेश असलेला नॅस्डॅक १०० निर्देशांकही १.८% ने वाढला, ज्यामुळे सलग दहाव्या दिवशी तेजी नोंदवली गेली. २०२१ नंतरची ही त्याची सर्वात मोठी तेजी आहे.































































