
कल्याण-मुरबाड मार्गावरील रायते पुलाजवळ सोमवारी इको टॅक्सी व सिमेंट मिक्सरचा अपघात होऊन 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूच्या या तांडवानंतर संपूर्ण मुरबाड तालुक्यावर शोककळा पसरली. याच अपघातात पन्हे गावातील तीन भावंडांचा समावेश आहे. त्यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा नातेवाईकांनी अक्षरशः टाहो फोडला. ग्रामस्थांच्याही डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. पन्हे, कोंदळी, पिंपळघर, अल्याणी व कातकरवाडी या गावांमध्ये तर रात्री चुलही पेटली नाही. सर्वत्र सन्नाटा पसरला होता.
मुरबाडमधील पन्हे हे छोटेसे गाव. याच गावातील स्नेहा मोहे, मानसी मोहे व प्रमेश मोहे या तीन भावंडांचा अपघातामध्ये करुण मृत्यू झाला. त्यांचे वडील लक्ष्मण मोहे यांचे कोरोनाच्या काळात निधन झाले होते. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. त्यामुळे ही तिघे मुले ठाण्यातील दिवा येथे आपल्या आजीकडे राहत होते. लग्नासाठी मुरबाडमध्ये टॅक्सीने जात असताना अपघातात तिघांनाही आपला जीव गमवावा लागला. स्नेहा, मानसी आणि प्रमेश या तिघांचे मृतदेह पन्हे गावात आले तेव्हा नातेवाईकांसह ग्रामस्थांनी हंबरडा फोडला. मुरबाडच्या गावांमध्ये तर चुली पेटल्या नसल्याचे सदानंद रोळकर, नथू मोहे, रत्ना मोहे, संदीप मोहे यांनी सांगितले.
मिक्सरचालकाला अटक
कल्याणहून मुरबाडच्या दिशेने जाणाऱ्या टॅक्सीला समोरून आलेल्या सिमेंट मिक्सरने जोरदार धडक दिल्याने 11 जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातप्रकरणी डंपरचालक कमलेश यादव याला पोलिसांनी अटक केली असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे.






























































