
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आपण यातून बाहेर पडलो तर इराणसोबतचे युद्ध ‘लवकरच थांबेल अशा स्थितीत आहे’. असे असले तरी देखील इराणला आपला देश पुन्हा उभा करण्यासाठी २० वर्षे लागतील, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे.
काही तासांपूर्वीच अमेरिकन ‘सेंट्रल कमांड’ने दावा केला होता की, ट्रम्प यांनी लागू केलेल्या नाकेबंदीच्या पहिल्या २४ तासांत त्यांनी इराणच्या बंदरांकडे जाणारी आणि तिथून येणारी सर्व सागरी वाहतूक यशस्वीरित्या रोखली आहे. यानंतर काही वेळातच ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीला अमेरिका पाठिंबा देत असल्याचेही सेंट्रल कमांडने म्हटले आहे.
अमेरिकेतली खासगी वृत्तवाहिनी ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत, ट्रम्प यांनी सांगितले की, ‘मला वाटते हे युद्ध संपत आले आहे, मी याकडे युद्ध संपण्याच्या अगदी जवळ आल्यासारखेच पाहतो’. ट्रम्प यांची ही संपूर्ण मुलाखत आज प्रसिद्ध होणार असल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.



























































