फक्त एका शाळेसाठी महापालिकेने ‘तिजोरी’ उघडली, कोपरखैराण्याच्या सीबीएसई शाळेत शिक्षक पाठवा, 35 कोटी कमवा; महिला उत्कर्ष मंडळाला मिळाला 10 वर्षांचा ठेका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरात चालवल्या जात असलेल्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असताना कोपरखैराणेतील सीबीएसई शाळेसाठी मात्र कोट्यवधींचा खर्च करण्यास सुरुवात केली आहे. या शाळेसाठी शिक्षक उपलब्ध करून देण्याचा ठेका पालिका प्रशासनाने नवी मुंबई महिला उत्कर्ष मंडळ या संस्थेला दिला आहे. हा ठेका 10 वर्षांचा असून त्यासाठी संस्थेला 35 कोटी 18 लाख रुपये देण्यात येणार आहेत. एकाच शाळेसाठी महापालिकेने आपली तिजोरी उघडली असून शिक्षक पाठवा आणि 35 कोटी कमवा, अशी अजब योजना तयार केल्याने नवी मुंबईकरांचे डोळे पांढरे झाले आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मागवलेल्या होत्या. त्याला तीन संस्थांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी नवी मुंबई महिला उत्कर्ष मंडळ ही संस्था पात्र ठरली आहे. ही संस्था कोपरखैराणे सीबीएसई शाळेसाठी 10 वर्षे शिक्षक उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी पालिका या संस्थेला 35 कोटी 18 लाख रुपये देणार आहे. त्याशिवाय शिक्षकांच्या भविष्यातील निधीसाठी 1 कोटी 30 लाख 85 हजार 400 रुपये अतिरिक्त देण्यात येणार आहेत. त्यामुळे संस्थेला दिली जाणारी रक्कम 36 कोटी 48 लाख 85 हजार 400 रुपये इतकी होणार आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरात प्राथमिक आणि माध्यमिक शाळा चालवल्या जातात. या शाळांमध्ये प्रत्येक वर्षी शिक्षकांची कमतरता असते.

नोकऱ्यात शिक्षकांची भरती करण्याऐवजी प्रशासनाने ठोक मानधनावर शिक्षकांची भरती केली आहे. त्या शिक्षकांना 25 हजार रुपये ठोक मानधन दिले जात आहे.

या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या माध्यमातून गणवेश, रेनकोट, दप्तर आणि शालेय साहित्यही दिले जात आहे. अनेक वेळा या वस्तू विद्यार्थ्यांना वेळेवर दिल्या जात नाही.

प्रस्ताव स्थायी समितीच्या पटल्यावर

सीबीएसई शाळेसाठी शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता हा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटल्यावर आला आहे. येत्या शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. सीबीएसई शाळेवर होत असलेल्या वार्षिक खर्चावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.