
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या तालुक्यात बालविवाहाचे बिनबोभाट ‘फेरे’ सुरू असल्याचे समोर आले आहे. रोहे तालुक्यातील गायचोळे आदिवासी वाडीवर लग्नाचे हे बार फुटणार होते. मात्र याची माहिती मिळताच पोलिसांनी या वाडीवर धडक देत नवरा-नवरीची वऱ्हाडी मंडळींसह थेट पोलीस ठाण्यात वरात काढली. पोलिसांच्या मध्यस्थीने असे दोन बालविवाह रोखण्यात यश आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अल्पवयीन मुलींचे हात पिवळे करून देण्याच्या प्रयत्नात असलेल्या यजमानींचे धाबे दणाणले आहेत.
कायद्यानुसार वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मुलीचे लग्न करता येत नाही, तर मुलांना २१ वर्षे पूर्ण होणे गरजेचे असते. मात्र रायगड जिल्ह्यात १४ ते १७ वयोगटातील मुलींचे लग्न लावून देण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या नेहमी महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा याबाबत सरकार किती प्रयत्नशील आहे हे भाषणांमधून सांगत असतात. मात्र त्यांच्याच तालुक्यात बालविवाह होत असल्याचे दिसून येत आहे. बाल विवाहामुळे येथील अल्पवयीन मुलींवर शारीरिक, मानसिक व भावनिक परिणाम होताना दिसत आहेत, तर आई व बाळाच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होतो.






























































