
संगमेश्वर तालुक्यात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, दुपारच्या सुमारास तापमान थेट ४२ अंशांवर पोहोचल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळी ११ नंतर बाहेर पडणे कठीण बनले असून अंगावर अक्षरशः ऊन भाजत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
गेल्या काही दिवसांत अचानक वाढलेल्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पेरणीपूर्व भाजावळीमुळेही वातावरणातील उष्णता वाढण्यास हातभार लागत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. तालुक्यांतील शाळा सकाळच्या सत्रात सुरू असल्या, तरी दुपारी १२ वाजता सुटणाऱ्या शाळांमुळे विद्यार्थ्यांना प्रखर उन्हाचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक ते दीड तास पायपीट करून शाळेत जावे-यावे लागत असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. शासनाचे पॅटचे पेपर आज दि. १५ व २२ एप्रिल रोजी होणार असल्याने विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जावे लागत आहे.
या परीक्षा एप्रिलच्या सुरुवातीलाच पूर्ण कराव्यात, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात आली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याची खंत व्यक्त केली जात आहे. वाढत्या तापमानामुळे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत शेतीची कामे मोठ्या प्रमाणात मंदावली आहेत. मजूर आणि शेतकरी दोघांनाही उन्हाचा त्रास होत असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. शहरातही परिस्थिती वेगळी नाही. चिपळूण येथे दिवसा एसीचा आधार घ्यावा लागत असल्याचे नागरिक सांगत आहेत. ग्रामीण भागात पाळीव जनावरांनाही उष्णतेचा फटका बसत असल्याचे चित्र आहे.






























































