
प्रशासकीय काळात झालेल्या कामांच्या टक्केवारीवरून कुळगाव-बदलापूर नगर परिषदेत भाजप आणि शिंदे गटात जुंपली आहे. नगरसेवकांच्या चौकशी समितीने 110 कामांच्या फाइल्सची चौकशी सुरू केली असून या कामांची बिले देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे ठेकेदार अडचणीत आले आहेत. भाजपच्या नगरसेवकांना हवी असलेली टक्केवारी मिळत नसल्यामुळे या कामांची बिले लटकवण्यात आली असल्याचा आरोप शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय जाधव यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ठेकेदारांनी पूर्ण केलेल्या 110 कामांची बिले नगर परिषद प्रशासनाकडून अद्याप काढण्यात आलेली नाहीत. त्यामुळे कुळगाव-बदलापूर नगर परिषदेत ठेकेदारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र त्यानंतरही नगर परिषद प्रशासनाकडून बिले देण्याबाबत कोणतीही हालचाल दिसत नाहीत. ही सर्व कामे प्रशासकीय काळातील आहेत. इतर कामांच्या फाइल्सप्रमाणे या 110 फाइल्स सर्वसाधारण सभेपुढे न आणता बिले काढण्यासाठी थेट लेखा विभागात पाठविण्यात आल्या होत्या. त्यामुळे कामे पूर्ण झाल्याची खातरजमा झाल्यावरच ठेकेदारांना बिले देण्यात यावीत, अशी भूमिका भाजपच्या नगरसेवकांच्या चौकशी समितीने घेतल्याने शिंदे गट अस्वस्थ झाला आहे.
कामांची बिले मिळावीत यासाठी ठेकेदारांनी आमदार किसन कथोरे यांचीही भेट घेतली. मात्र कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे 2010 पासूनच्या पालिकेतील कामांची अँटी करप्शनकडून चौकशी करण्यात यावी म्हणून पत्र दिले होते.
कथोरे यांच्या पत्रानुसार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक भरत जाधव यांनी जानेवारीत पालिकेकडे कामांच्या फाइल्सची मागणी केली होती. त्यानंतर नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखालील सदर कामांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
येत्या 15 दिवसांत ठेकेदारांना बिले न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय जाधव यांनी दिला आहे. राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या या दोन्ही गटांची एकमेकांवर कुरघोडी सुरू असल्यामुळे ठेकेदार अडचणीत आले असल्याचा आरोप राजकीय वर्तुळातून होत लागला आहे.


























































