क्रिकेट खेळणे जीवावर बेतले, पाण्याच्या टाकीत पडून मुलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाण्याच्या टाकीत पडलेला चेंडू काढण्यासाठी 13 वर्षांचा मुलगा गेला खरा.. पण खोल पाण्याचा अंदाज न आल्याने टाकीतील पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज भिवंडीतील समदनगर भागात घडली. अरहम खान असे त्याचे नाव असून त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

समदनगर परिसरातील मुले परिसरात क्रिकेट खेळत असताना त्यांचा चेंडू येथील एका इमारतीच्या खालील भागात बनविण्यात आलेल्या पाणी साठवण्याच्या टाकीत पडला होता. त्यावेळी अरहम हा चेंडू काढण्यासाठी पाण्याच्या टाकीत उतरला, पण पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. सोबत असलेल्या मुलांनी आरडाओरडा करत याची माहिती दिल्यानंतर काही युवकांनी तेथे येऊन त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी अरहम याचा मृत्यू झाला होता.