
राज्यात उन्हाची तीव्रता पुन्हा वाढली आहे. ग्रामीण भागासह शहरी भागांनाही तीव्र उन्हाचे चटके बसू लागले असून पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागाला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसणार आहे. प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थिती आणि पूर्वेकडून येणारे वारे यामुळे कोकणासह उर्वरित महाराष्ट्रात उष्ण वातावरण राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने चार दिवसांसाठी सावधगिरीचा अलर्ट जारी केला आहे. मुंबई शहरातही दोन दिवस कमाल तापमान 36 अंशांच्या घरात राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेले दोन दिवस मुंबई शहर व उपनगरांसह उष्णतेत वाढ झाली आहे. तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानाने कहर केला आहे. विदर्भातील बहुतांश हवामान केंद्रांवर कमाल तापमान 40 अंशांच्या पुढे नोंदले जात आहे. जळगावमध्ये सलग काही दिवस सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. विदर्भ, मराठवाड्याप्रमाणे राज्याच्या उर्वरित भागांतही पुढील चार दिवसांत उष्णतेत मोठी वाढ होणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे. वाऱ्यांची दिशा बदलल्याने तसेच प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थितीमुळे कोकण भागात उष्ण आणि दमट वातावरण निर्माण होत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
पुढील चार दिवस मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात दोन दिवस उष्णतेची लाट धडकणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांनाही खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.




























































