इराणी जहाजाने अमेरिकेला दिला चकवा? तेलवाहू जहाज होर्मुझमधून सुखरूप पार झाल्याचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाइल फोटो

इराणला नमवण्यासाठी अमेरिकेने जंगजंग पछाडले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी रोखणाऱ्या इराणविरोधात अमेरिकेने पावले उचलत इराणच्या बंदराकडे जाणारे किंवा इराणच्या बंदरातून बाहेर पडणारे जहाजांचे मार्ग ब्लॉक करणार असल्याचा निर्णय अमेरिकेने घेतला होता. मात्र इराणचे एक भलेमोठे कच्चे तेलवाहू जहाज (VLCC) अमेरिकन नाकेबंदी झुगारून होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडून इराणच्या किनाऱ्यावर पोहोचले आहे, असा दावा मुंबईतील इराणच्या महावाणिज्य दूतावासाने ‘X’ वरील एका पोस्टद्वारे केला आहे.

इराणच्या किनारपट्टीकडे किंवा त्यांच्या बंदरांच्या दिशेने आंतरराष्ट्रीय पाण्यातून कोणत्याही जहाजाला जाऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका अमेरिकेने घेतलेली असताना ही घटना समोर आली आहे.

इराणी दूतावासाने म्हटले आहे की, सुमारे २० लाख बॅरल कच्चे तेल वाहून नेण्याची क्षमता असलेल्या या ‘सुपरटँकर’ने संपूर्ण प्रवासादरम्यान आपली ट्रॅकिंग यंत्रणा (AIS) सुरू ठेवली होती. असे करून अमेरिकेचे निर्बंध आणि धमक्यांना उघडपणे आव्हान देण्यात आले आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय हे जहाज आपल्या नियोजित स्थळी पोहोचले असे सांगण्यात आले आहे. दूतावासाच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, ‘अमेरिकेने ब्लॅकलिस्ट केलेल्या इराणच्या एका ‘व्हीएलसीसी’ सुपरटँकरने अगदी कोणतेही गोष्ट न लपवता, आपले ट्रॅकर सुरू ठेवून आंतरराष्ट्रीय जलसीमा आणि होर्मुझची सामुद्रधुनी पार केली आणि ते इराणच्या किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले’.

इराणी बंदरांतून निघणाऱ्या सर्व जहाजांची नाकेबंदी सुरू केल्याचे आणि इराणला टोल देणाऱ्या प्रत्येक जहाजाला रोखले जाईल, असे अमेरिकेने जाहीर केल्यानंतर ही घटना घडली आहे. अमेरिकन सेंट्रल कमांडने दावा केला होता की, इराणच्या बंदरांवरील नाकेबंदीची पूर्णपणे अंमलबजावणी झाली आहे. इराणची ९० टक्के अर्थव्यवस्था सागरी व्यापारावर अवलंबून असून, नाकेबंदी लागू झाल्यापासून ३६ तासांपेक्षा कमी कालावधीत अमेरिकन सैन्याने इराणची सागरी आयात-निर्यात पूर्णपणे रोखली असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, इराणच्या या दाव्याने अमेरिकेच्या नाकेबंदीचा पर्याय देखील फसला आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.