
इराण, अमेरिका-इस्रायलमध्ये 28 फेब्रुवारीला युद्ध सुरू झाले आणि याच्या झळा हिंदुस्थानला बसल्या. आखातातील या युद्धामुळे हिंदुस्थानच्या आयात-निर्यातीचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे. या युद्धाचा थेट परिणाम हिंदुस्थानच्या निर्यातीवर झाला असून पश्चिम आशियातील देशांना होणाऱ्या निर्यातीत मार्च महिन्यात तब्बल 58 टक्के घट झाल्याची माहिती वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिली.
मध्य पूर्वेत उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पश्चिम आशियाई क्षेत्रातील शिपमेंटवर गंभीर परिणाम झाला आहे, असे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले. त्यामुळे मार्च महिन्यात पश्चिम आशियातील हिंदुस्थानच्या निर्यातीत 57.95 टक्के घट झाली आहे. केवळ निर्यातच नाही तर या देशांकडून होणाऱ्या आयातीतही 51.64 ची घसरण झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
इराण, अमेरिका-इस्रायलमध्ये दीड महिन्यांपूर्वी युद्धाला सुरुवात झाली. या युद्धामुळे जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला होर्मुझ सामुद्रधुनी हा मार्ग बंद झाला. इराणने या मार्गावरून मालवाहतुकीवर निर्बंध घातल्यामुळे हिंदुस्थानचाही बहुतांश व्यापार ठप्प झाला आहे.
मार्च महिन्यात हिंदुस्थानची एकूण निर्यात 7.44 टक्क्यांनी घटून 38.92 अब्ज डॉलर इतकी राहिली असली तरी वार्षिक आकडेवारी काहीसा दिलासा देणारी आहे. 2025-25 या वर्षात वस्तूंची निर्यात 1 टक्क्याने वाढून 441.78 अब्ज डॉलर होईल असा अंदाज आहे. तसेच सेवा क्षेत्राची निर्यात 418.31अब्ज डॉलर राहण्याची शक्यता आहे. हिंदुस्थान 2025-26 मध्ये वस्तू आणि सेवांच्या निर्यातीत एकूण 4.22 टक्के वाढ नोंदवू शकतो. त्यामुळे एकूण आकडा 860 अब्ज डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे.
दरम्यान, इराण युद्धाच्या सावटातच हिंदुस्थान आता अमेरिकेशोबतचे व्यापारी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बदललेल्या टॅरिफ नियमांमुळे मार्चमध्ये होणारा व्यापार करार लांबणीवर पडला होता. आता या व्यापार करारावर चर्चा करण्यासाठी हिंदुस्थानचे प्रतिनिधीमंडळ 20 ते 22 एप्रिल दरम्यान वॉशिंग्टनचा दौरा करणार आहे.



























































