IPL 2026 – चूक झाल्याचे मान्य करा अन् ‘त्या’ खेळाडूला बाकावर बसवा, वीरेंद्र सेहवागने KKR ला झापलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या हंगामामध्ये तीन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सची आतापर्यंतची कामगिरी सुमार राहिली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाताच्या संघाला यंदा विजयाचे खातेही उघडता आलेले नाही. कोलकाताने पाच सामने खेळले असून चार सामन्यात पराभव स्वीकारला, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. मंगळवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या पराभमुळे कोलकाताचा संघ गुणतालिकेत तळाला पोहोचला आहे. यानंतर टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने केकेआर संघ प्रशासनावर जोरदार टीका केली. वीरूने खराब फॉर्मात असलेल्या कॅमेरून ग्रीन याला बाकावर बसवण्याचा सल्ला केकेआरला दिला आहे.

ऑस्ट्रेलियचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला होता. मात्र या हंगामातील 5 सामन्यांत त्याने केवळ 56 धावा केल्या असून त्याला फक्त 1 बळी घेता आला आहे. चेन्नईविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यातही तो शून्यावर बाद झाला. यामुळे वीरेंद्र सेहवाग याने केकेआरच्या संघ प्रशासनाला चांगलेच झापले. कॅमेरून ग्रीनला 25.20 कोटी रुपयांना खरेदी करणे ही मोठी चूक होती, असे स्पष्ट मत सेहवागने व्यक्त केले आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

तुमच्याकडे भरपूर पैसा होता आणि तरीही तुम्ही कॅमेरून ग्रीनसारख्या खेळाडूवर 25 ते 27 कोटी खर्च केले. आता तो संघासाठी ओझे ठरत आहे. जर तुम्ही त्याला खेळवले तर तो कामगिरी करत नाहीये आणि जर बसवले तर लोक प्रश्न विचारतील की इतके पैसे खर्च करून त्याला बेंचवर का बसवले? पण चूक मान्य करण्यात कसलीही लाज बाळगू नका. फक्त हे कबूल करा की ग्रीनवर इतकी मोठी रक्कम खर्च करणे ही तुमची चूक होती, असे सेहवाग म्हणाला.

डगआऊटमध्ये मोबाईलचा गोंधळ, भिंडर अडचणीत; 24 तासांत उत्तर द्या, नाहीतर… एसीएसयूने कारवाईचा दिला इशारा

केकेआरच्या विजयाचा मार्ग

दरम्यान, कोलकाताच्या संघाला विजयाचा मार्ग सापडत नसल्याने वीरूने संघात बदल करण्याचा सल्ला दिला आहे. ग्रीनच्या जागी न्यूझीलंडच्या टीम सायफर्टला संधी द्यावी, असा सल्ला त्याने दिला आहे. टीम सायफर्ट आणि फिन ॲलन यांनी डावाची सुरुवात करावी. कर्णधार अजिंक्य रहाणेने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे. त्यानंतर पॉवेल, रिंकू सिंग आणि अंगकृष रघुवंशी यांना परिस्थितीनुसार फलंदाजीला पाठवावे, असे सेहवाग म्हणाला.

शुक्रवारी गुजरातशी सामना

दरम्यान, कोलकाताचा सहावा सामना शुक्रवारी गुजरात टायटन्स संघाविरुद्ध होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना होणार आहे. या लढतीत वीरूच्या सल्ल्यानुसार ग्रीनला डच्चू देऊन कोलकाताचा संघ नवीन जोडी मैदानात उतरवते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.