
झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील सारंडा जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये बुधवार सकाळपासून चकमक सुरू आहे. या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाल्याची कळते. मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळाला नाही. छोटानागरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही चकमक सुरू आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये अधूनमधून गोळीबार सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सारंडा जंगलात नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली. सुरक्षा दलांना पाहताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही याला प्रत्युत्तर देण्यास सुरवात केली. या कारवाईत तीन नक्षलवादी ठार झाल्याचे कळते. तथापि, पोलीस अधिकाऱ्यांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.
कारवाई अद्याप सुरू असून संपूर्ण परिस्थिती स्पष्ट झाल्यानंतरच अधिकृत निवेदन जारी केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सारंडा जंगलात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, सुरक्षा दल नक्षलवाद्यांचा कसून शोध घेत आहेत.


























































