आंध्र प्रदेशात डेटोनेटर्स आणि गॅस सिलिंडरचा स्फोट; 5 ठार, 20 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यात बुधवारी एका घरात डेटोनेटर्स आणि गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात पाच जण ठार झाले असून, अन्य 20 जण जखमी झाले आहेत. कदिरी मंडलातील कुम्मरावंदला पल्ली गावात ही घटना घडली.

फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, एका कामगाराच्या घरात बेकायदेशीररित्या डेटोनेटर्स आणि गॅस सिलिंडर्स साठवून ठेवले होते. या डेटोनेटर्स आणि गॅस सिलिंडर्सचा स्फोट झाल्याने संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. या स्फोटात घराला लागून असलेल्या अन्य घरांचेही नुकसान झाले.

स्फोटातील जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी 12 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव व मदतकार्य सुरू केले. घरात ठेवलेल्या अवैध साठ्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.