
मुंबईत सुमारे 13 हजार 500 हून अधिक उपकरप्राप्त इमारती असून त्यामध्ये लाखो भाडेकरू वास्तव्यास आहेत. यापैकी बहुतांश इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर पागडी आणि उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. पत्रात त्यांनी म्हटलेय, महाविकास आघाडी सरकारच्या काळात 2020-2021 मध्ये मुंबईतील उपकरप्राप्त (सेस) पागडी इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी सेक्शन 79 (अ) व 79 (ब) बाबत कायद्यात तरतूद करण्यात आली होती. सदर कायद्याला राष्ट्रपती महोदयांचीही मंजुरी प्राप्त झाली होती. तथापि, काही जागा मालकांनी याविरोधात कायदेशीर अडचणी निर्माण केल्या आहेत.
भाडेकरूंच्या हक्काचे संरक्षण करा
मुंबईत सुमारे 13,500 हून अधिक उपकरप्राप्त इमारती असून त्यामध्ये लाखो भाडेकरू वास्तव्यास आहेत. यापैकी बहुतांश इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. तसेच हा विषय न्यायप्रविष्ट असतानादेखील भाडेकरूंना घरे खाली करण्याची नोटीस देण्यात येत आहे. तरी या कारवाईवर स्थगिती द्यावी व ज्या इमारती अतिधोकादायक स्थितीत आहेत त्यातील भाडेकरूंची योग्यप्रकारे नोंद करून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. या विषयाकडे वैयक्तिक लक्ष देऊन भाडेकरूंना न्याय मिळेल असा मार्ग काढावा, जेणेकरून पुनर्विकास प्रक्रियेस चालना मिळेल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.



























































