
मालाड स्थानकात प्राध्यापकाची चाकू मारून हत्या झाली होती. या प्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी आरोपी ओमकार शिंदे विरोधात 247 पानांचे आरोपपत्र बोरिवली येथील न्यायालयात दाखल केले.
प्राध्यापक आलोक कुमार हे मालाड पूर्व येथे राहत होते. ते विलेपार्ले येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत होते. 24 जानेवारीला त्यांनी अंधेरी रेल्वे स्थानकातून लोकल पकडली. सायंकाळी पावणेसहा वाजता लोकल मालाड स्थानकात आली. तेव्हा ओमकारचा आलोक कुमार याच्याशी किरकोळ वाद झाला. शाब्दिक बाचाबाचीनंतर ओमकारने त्याच्याकडील तीक्ष्ण हत्याऱ्याने आलोक कुमार याच्यावर वार केले. पोलिसांनी आलोककुमारला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घडल्या प्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. फुटेजच्या आधारे पोलिसांनी ओमकारला कुरारगाव येथून ताब्यात घेऊन अटक केली.
ओमकार शिंदेला अटक केल्यावर त्याच्या राहत्या घरी हत्यार आणि कपडे सापडले होते. तेदेखील पोलिसांनी तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झाला नाही. सिंग याच्यावर जेथे हल्ला झाला, तो लोकलचा डबा प्रवाशांनी भरला होता. खटला अधिक भक्कम करण्यासाठी आणखी साक्षीदाराची गरज होती. पोलिसांनी मालाड रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर रिव्हर्स ट्रॅकिंग पद्धतीचा वापर करून गर्दीतील चेहरे टिपले. रेल्वे सुरक्षा बलाकडे उपलब्ध असलेल्या फेस रेकग्निशन अॅप्स प्रणालीचा वापर करून गर्दीतील काही प्रवाशांची ओळख पटवून त्यांच्याशी संपर्क साधला. घटनास्थळी सापडलेले कपडे आणि हत्याऱ्यावरील रक्ताचे नमुने सिंगच्या रक्ताशी जुळले आहेत.
63 साक्षीदारांचे जबाब
आलोककुमार याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 247 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. आरोपपत्रात पोलिसांनी एकूण 63 साक्षीदारांचे जबाब समाविष्ट केले आहेत. दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचादेखील समावेश आहे. त्याचे जबाब न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर नोंदवण्यात आले आहेत.



























































