
एसटी महामंडळाच्या कामगारांना लवकरच सरकारी कर्मचाऱयांप्रमाणे वेतन मिळण्याची चिन्हे आहेत. कामगारांच्या आर्थिक प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आश्वासन देताना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी वेतनवाढीसंदर्भात संकेत दिले. विविध कामगार संघटनांच्या कृती समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना परिवहनमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱयांप्रमाणे एसटी कामगारांचे वेतन करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे राज्यभरातील 86 हजारांहून अधिक कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एसटी कामगारांच्या आर्थिक प्रश्नांबाबत संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयात महामंडळाचे अध्यक्ष सरनाईक यांची भेट घेतली. शिष्टमंडळात हनुमंत ताटे, संदीप शिंदे, हिरेन रेडकर, मुकेश तिगोटे, सुनील निरभवणे, गजानन माने, एम. जी. कांबळे, लक्ष्मण तिडके आदी कामगार संघटना प्रतिनिधी होते. एसटी कामगारांना 53 टक्क्यांवरुन 58 टक्के महागाई भत्ता तसेच फरकासह घरभाडे भत्ता 10/20/30 टक्के करणे, एक टक्का वेतनवाढीचा दर इत्यादी थकबाकीसंबंधी निर्णय घेण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले.
पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
एसटी कामगारांच्या महागाई भत्ता, घरभाडे भत्ता तसेच इतर आर्थिक प्रश्नांबाबत पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचे आश्वासन परिवहनमंत्र्यांनी दिले. याचवेळी त्यांनी सरकारी कर्मचाऱयांप्रमाणे एसटी कामगारांचे वेतन करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे लवकरच एसटी कामगारांचे आर्थिक प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत.
आर्थिक कुचंबणा होत असलेल्या एसटी कामगारांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार मिळावा यासाठी संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत. परिवहनमंत्र्यांनी त्याला दुजोरा देत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. सरकारने हा सकारात्मक निर्णय जलदगतीने घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे.
हिरेन रेडकर, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना



























































