जमीन खरेदीपूर्वी खात्यात 3 कोटींची उलाढाल, खरातप्रकरणी तपासात नवीन माहिती उघड; नाशिकच्या दाम्पत्यासह शेवगावच्या चौघांची चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिर्डीत चार एकर जमिनीच्या व्यवहारापूर्वी भोंदू अशोक खरातच्या नाशिकमधील दोन बँक खात्यांत अहिल्यानगर आणि नाशिकच्या सहाजणांनी 3 कोटींपेक्षा अधिक रक्कम आरटीजीएसने टाकल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे यात शेवगावच्या चौघांचा समावेश आहे.

भोंदू खरात, त्याची पत्नी कल्पनाची नाशिक आणि सिन्नर येथील बँक ऑफ बडोदा आणि युनियन बँक या दोन राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाती आहेत. त्यात मागील दोन वर्षांत 21 कोटींपेक्षा अधिक व्यवहार  झाले आहेत. शिर्डीतील रावसाहेब गोंदकर यांच्या चार एकर जमिनीची पाच कोटींना खरेदी करण्यात आली होती. अशोक खरातने गोंदकर यांना ही रक्कम वेगवेगळय़ा तारखांना वर्ग केली होती. मात्र, रावसाहेब गोंदकर याने फसवणूक झाल्याची फिर्याद दिल्यानंतर शिर्डी पोलिसांनी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात यासह अरविंद बावके, किरण सोनवणे आणि अशोक तांबे यांच्याविरोधात सावकारकी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

दीपक लोंढे पोलिसांच्या रडारवर

भोंदू अशोक खरात प्रकरणात दीपक लोंढे यांची शिर्डी पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. अशोक खरातसोबत असलेल्या आर्थिक व जमीन व्यवहारांमध्ये दीपक लोंढे यांचा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचा संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, मंत्री दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय म्हणून लोंढे यांचे नाव समोर येत असल्याने राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ माजली आहे.