तिरंग्याची रिबीन कापण्यास नकार, ओमर यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा सन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज एका कार्यक्रमात ‘तिरंगा’ रिबीन कापण्यास नकार देत राष्ट्रध्वजाबद्दलचा आदर व्यक्त केला. राष्ट्रध्वजाचा आदर राखा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

श्रीनगरमधील कश्मीर हाट येथे ‘नो युअर आर्टिझन्स’ हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनासाठी बुधवारी ओमर अब्दुल्ला तिथे पोहोचले. प्रदर्शन स्थळाच्या प्रवेशद्वारावर उद्घाटनासाठी तिरंगी रिबीन बांधण्यात आली होती. अब्दुल्ला यांच्या हे लक्षात येताच त्यांनी ती कापण्यास नकार दिला. ही रिबीन दोन्ही बाजूंनी अलगद काढा, अशी सूचना त्यांनी केली. ती काढल्यावर ओमर यांनी स्वतः रिबीन घडी घालून ती आयोजकांकडे सोपवली.