
सूर्य आग ओकत असल्याने वाढलेल्या उकाडय़ामुळे नागरिक हैराण झाले असतानाच राज्यभरात पुढील चार दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने ‘ताप’ आणखी वाढला आहे. नांदेडच्या देगलूरमध्ये आज सर्वाधिक म्हणजे 47 अंश सेल्सिअस तर अकोल्यात 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून विदर्भात उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईसाठीदेखील 16 एप्रिल रोजी खबरदारीचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
(पान 1 वरून) अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचे प्रमाण घटले असून कोरडय़ा हवामानामुळे तापमान वाढत असल्याचे हवामान तज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात विदर्भात सध्या सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. पुढील दोन दिवस संपूर्ण राज्यात हीच स्थिती कायम राहणार असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबईतही 16 एप्रिल रोजी हवामान दमट राहणार असल्याने उकाडा वाढणार असल्याचेही हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात
आले.
‘एल्डोराडो’ या जागतिक हवामान संकेतस्थळाच्या आकडेवारीनुसार अकोला आणि कर्नाटकातील ‘कलबुर्गी’ या शहरांनी मंगळवारी जगातील सर्वाधिक म्हणजे 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले.
महत्त्वाच्या शहरांचे तापमान
(अंश सेल्सिअसमध्ये)
| मुंबई | 34.5 |
| नवी मुंबई | 37 |
| ठाणे | 37 |
| नाशिक | 38.8 |
| नागपूर | 43.4 |
| संभाजीनगर | 40.8 |
| रत्नागिरी | 32.8 |
| कोल्हापूर | 38.9 |
| पुणे | 39.9 |
| सातारा | 40.9 |
देगलूरमध्ये 47 डिग्री
नांदेडच्या देगलूर तालुक्यातील सुंदगी गावात आज देशातील सर्वाधिक म्हणजे 47 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर अकोल्यात पारा 44 वर गेला.
उद्या सर्वाधिक ‘ताप’
17 एप्रिल रोजी सर्वाधिक तापमानाची नोंद होईल असा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. उकाडा वाढला असतानाच काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात उष्माघाताने दोघांचा मृत्यू
गेल्या चार दिवसांपासून 44 अंशांवर सर्वाधिक तापमानाची नोंद होणाऱ्या अकोला जिह्यात उष्माघातामुळे एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एका मालवाहू रिक्षामध्ये या व्यक्तीचा मृतदेह सापडला असून ओळख पटलेली नाही. तर हिंगोलीमध्येही उष्माघाताने एका 31 वर्षीय तरुणाचा बळी गेल्याची घटना घडली आहे. शेख रफिक शेख उस्मान असे या तरुणाचे नाव आहे. पोस्टमॉर्टमनंतर या तरुणाचा मृत्यू उष्माघातानेच झाल्याचे समोर आले.





























































