
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या भेटीबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आज स्पष्टच बोलले, खरातची भेट ही दीपक केसरकर यांच्या आग्रहामुळे झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आणि म्हणाले, एके ठिकाणी जायचे म्हणून त्यांच्यासोबत गेलो, असेही विखे-पाटील म्हणाले.
एकनाथ शिंदे हे शिर्डीला आले होते तेव्हा मी त्यांच्यासोबत अशोक खरात याच्याकडे गेलो. त्यावेळी केसरकर यांनी आग्रह केला, त्यामुळे मी त्यांच्यासोबत गेलो. काही गोष्टी अज्ञानातून घडल्या. शिंदे यांना खरातबाबत काहीच माहिती नव्हती. त्याची पार्श्वभूमी माहिती असती तर ते तिकडे गेले असते का, असा सवाल विखे-पाटील यांनी केला.
दमानिया यांनी जे आरोप केले आहेत, त्याबाबतचे सत्य चौकशीत समोर येईल. खरात प्रकरणात आम्ही पहिला गुन्हा दाखल केला म्हणून हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात जे दोषी असतील, ते मोठय़ा पदावर असतील तरी कारवाई झाली पाहिजे, असे विखे-पाटील म्हणाले.
हा प्रकार राजकारण्यांना धडा शिकवणार
अज्ञानाने घडलेल्या गोष्टी आणि माहिती असून जाणे यामध्ये फरक आहे. इथून पुढे कोणी भविष्य सांगायला आले तर आधी त्याचे भविष्य बघावे लागेल. हा प्रकार राजकारण्यांना धडा शिकवणारा असून राजकारणी 100 टक्के धडा घेतील, असे विखे-पाटील म्हणाले.
लोकांना दोष देऊ नये
अनेकांचे खरातसोबत फोटो आहेत, समारंभात पाय धुताना, भाषण करताना फोटो आणि नावे आलेली आहेत. आपल्या भागातील माणूस देवाचा अवतार आहे असे समजून शिर्डीतील काही लोक बळी पडले; पण यासाठी लोकांना दोष देऊ नये, असे राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.
































































