
बारामतीच्या पोटनिवणुकीत अपक्ष म्हणून मैदानात असणाऱ्या करुणा मुंडे यांना रोखणे भाजपच्या हातात होते. पण त्यांनी तसे प्रयत्नच केले नाहीत. कारण करुणा मुंडे यांना भाजपची अप्रत्यक्ष फूस आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला.
बारामती पोटनिवडणुकीत सध्या 23 अपक्ष उमेदवारांचे अर्ज राहिलेत. हे अर्ज राहायला नको होते. अजित पवार यांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करून जो उमेदवारांचा आकडा 60 होता तो 23वर आणला. अपक्ष उमेदवारांची नावे पाहिली तर त्यात करुणा मुंडे यांचे एक नाव आहे. त्यांना भाजपच्या एखाद्या मोठय़ा नेत्याने सांगितले असते तर त्यांनी आपला अर्ज ठेवला नसता. पण तसे प्रयत्न केले नाहीत, असे रोहित पवार म्हणाले.
ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पवार साहेबांपासून अनेकांनी प्रयत्न केले. मोठय़ा पक्षांनी उमेदवार दिला नाही. पण अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी उभे राहायला नको होते, आपल्या गावातून एकसुद्धा मत अपक्ष उमेदवारांना होणार नाही याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. सर्व 99 टक्के मतदान सुनेत्रा पवारांना होईल यासाठी प्रयत्न करा. जे बाहेरून आलेत त्यांना एकसुद्धा मत मिळाले नाही पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले.
सुनेत्रा काकीसाठी रोहित पवार मैदानात
काकी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. काटेवाडी गावातून घोंगडी बैठकीच्या माध्यमातून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. या वेळी त्यांच्यासोबत वडील राजेंद्र पवार, बहीण सई पवारदेखील उपस्थित होते.




























































