
अमरावतीच्या परतवाडा शहरात तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक शोषण आणि त्यानंतर ब्लॅकमेलिंग केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहमद अयाज मोहम्मद तनवीर याच्या बेकायदा घरावर आज अचलपूर नगर परिषदेने बुलडोझर फिरवून कारवाई केली.
अमरावती लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. यामध्ये प्रमुख आरोपी मोहमद अयाज मोहम्मद तनवीर याला अटक केल्यानंतर या प्रकरणात उजेर खान इकबाल खान, तरबेज खान तस्लिम खान आणि मोहम्मद साद मोहम्मद सादिक या तिघांनाही अटक केली आहे. दरम्यान, मुख्य आरोपी अयाज तनवीरने घरात बेकायदेशीर बांधकाम केल्याचे समोर आले होते. याबाबत अचलपूर नगर परिषदेने आरोपीच्या कुटुंबाला अतिक्रमणासंदर्भात नोटीसही बजावली होती. त्यानुसार आज नगर परिषदेने पोलीस बंदोबस्तात बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर चालवला.
चौकशीसाठी ‘एसआयटी’
लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणाची मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करीत असल्याचे आज जाहीर केले. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपीला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपींच्या मोबाईलमधील ‘डाटा’ मिळवण्याचा प्रयत्न
तपासादरम्यान पोलिसांना आरोपींच्या मोबाईलमध्ये मोठय़ा प्रमाणात अश्लील व्हिडीओ मिळत आहेत. हे व्हिडीओ कुणाकुणाला शेअर केले, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात आला का, याचा तपासही सायबर तज्ञांकडून केला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. चिखलदरा परिसरातील हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.





























































