
हिंदुस्थानचा माजी कसोटीपटू विनोद कांबळीचा जीवनाशी सुरू असलेला कठीण लढा अजूनही सुरूच आहे. एकेकाळी मैदानावर गोलंदाजांना थरकाप उडवणारा हा डावखुरा फलंदाज आज स्वतःच्या शरीराशी आणि स्मरणशक्तीशी दोन हात करत आहे. त्याच्या मेंदूत गाठ झाल्याची माहिती समोर आली असून त्याला कोणत्याही क्षणी मेंदूचा झटका (ब्रेन स्ट्रोक) येण्याचा धोका आहे.
विनोदची प्रकृती आता पूर्वीपेक्षा स्थिर आहे, पण तो पूर्णपणे बिल्कुलही बरा झालेला नाही. त्याची स्मरणशक्ती अजूनही कमकुवत असून, अनेक गोष्टी त्याला तुटक तुटक आठवताहेत. सर्वात चिंतेची बाब म्हणजे त्याला धूम्रपान टाळायचे आहे हेही तो कधीकधी विसरते.
साधारण वर्षभरापूर्वी ठाण्यातील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार झाले. मुंबईत रमाकांत आचरेकर स्मारकाच्या अनावरणावेळी सचिन तेंडुलकरचा हात धरूनही त्याला उभे राहणे कठीण जात होते. तोल सावरताना त्याची झालेली धडपड पाहून संपूर्ण क्रिकेटविश्व हळहळले होते. सुनील गावसकर आणि कपिल देव यांच्यासारख्या दिग्गजांनी त्याच्या पुनर्वसनासाठी हात पुढे केला आहे. त्याचा जवळचा मित्र मार्कस् कुटोने दिलेल्या माहितीनुसार त्याची स्मरणशक्ती फारशी सुधारलेली नाही, मात्र, मेंदूत असलेली रक्ताची गाठ चिंतेचा विषय आहे.




























































