आता तरी विजया पावशील का? मुंबई इंडियन्सचा वानखेडेवर विजयशोध, रोहितच्या दुखापतीने वाढले ठोके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सलग तीन पराभवांनी खचलेले मनोधैर्य, त्यातच रोहित शर्माच्या दुखापतीने वाढलेली चिंता अशा दुहेरी संकटात सापडलेला मुंबई इंडियन्स संघ आज वानखेडेवर दुसऱ्या विजयासाठी झुंज देणार आहे. आयपीएलच्या विजयी ट्रकवर पुन्हा यायचे असेल, तर पंजाब किंग्जविरुद्ध सामना जिंकणे मुंबईसाठी अत्यावश्यक आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून हरवलेला विजय आता वानखेडेवर शोधावाच लागणार. अन्यथा प्ले ऑफमध्ये धडक मारण्याचे स्वप्न आतापासूनच अंधुक होऊ लागेल.

फलंदाजीगोलंदाजीची चिंता

सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्याकडून अपेक्षित कामगिरी होत नाहीये, तर सुरुवातीच्या षटकांत फलंदाजांचे चाचपडणे कायम आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा धावगती रोखतोय, पण विकेट मिळत नाहीत. ट्रेंट बोल्ट आणि हार्दिक पंड्या हे अनुभवी गोलंदाजही अद्याप प्रभाव पाडण्यात अपयशी ठरत असल्याने मुंबईची चिंता अधिक वाढली आहे.

पंजाबची विजयी लय

पंजाब किंग्ज संघ पूर्ण आत्मविश्वासात आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली त्यांनी चारपैकी तीन सामने जिंकत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. प्रभसिमरन सिंह आणि प्रियांश आर्य तुफान फॉर्मात असून संघाची फलंदाजी बळकट दिसतेय. मात्र अर्शदीप सिंगची महागडी गोलंदाजी पंजाबसाठी चिंतेचा विषय ठरते आहे.

कोण ठरणार सरस?

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 34 सामन्यांत 17-17 अशी बरोबरी झालीय. म्हणजेच आजची लढत अत्यंत चुरशीची ठरणार. प्रश्न एकच आहे की, मुंबई इंडियन्सचा विजयशोध पूर्ण होणार की पंजाब किंग्ज विजयी सातत्य कायम राखणार, या प्रश्नाचे उत्तर उद्याच मिळू शकेल.

उभय संभाव्य संघ 

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, रायन रिकल्टन (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिशेल सॅण्टनर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्पंडे, जसप्रीत बुमरा.  इम्पॅक्ट प्लेयर : शेरफेन रदरपर्ह्ड.

पंजाब किंग्ज : प्रभसिमरन सिंह, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंह, नेहाल वढेरा, मार्कस स्टोइनिस, माकाx जेनसन, जेवियर बार्टलेट, विजयकुमार विशाक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
इम्पॅक्ट प्लेयर : प्रियांश आर्य.

रोहितच्या खेळण्याबाबत साशंकता

मुंबईच्या अडचणीत भर म्हणजे रोहित शर्माची दुखापत. मागील सामन्यात फलंदाजीदरम्यान बरगडीला मार लागल्याने त्याला ‘रिटायर्ड हर्ट’ व्हावे लागले होते. सराव सत्रालाही तो गैरहजर राहिल्याने त्याच्या खेळण्याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याची अनुपस्थिती मुंबईसाठी मोठा धक्का ठरू शकते. मुंबईचा विजयशोध त्याच्याच बॅटने घेणे अधिक सोपे ठरू शकते.