
श्री मावळी मंडळाच्या 73 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महिला गटात जय भारत स्पोर्ट्स क्लब, ज्ञानशक्ती युवा संस्था, टागोर नगर मित्र मंडळ, रा. फ. नाईक, विवेक स्पोर्ट्स क्लब यांनी दमदार खेळ करत दुसऱ्या फेरीत धडक मारली. तर पुरुष गटात श्री विठ्ठल, नंदकुमार, भाऊ स्पोर्ट्स, श्रीराम, हनुमान सेवा, शूर जवान, उत्कर्ष या संघांनी विजयी सलामी दिली.
मावळी मंडळाच्या या स्पर्धेत एकूण 110 संघांचा सहभाग असलेल्या पटांगणावर महिला गटात रा. फ. नाईक संघाने शताब्दी स्पोर्ट्स क्लबवर 34-30 असा निसटता विजय मिळवला. रेखा चिकणेच्या अचूक चढाया आणि आरती शेळकेच्या पकडीमुळे मध्यंतराला 7 गुणांची आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत टिकवली. दुसऱ्या सामन्यात टागोर नगर मित्र मंडळाने प्रेरणा कला पेंद्रावर 27-23 अशी मात करत आपली ताकद दाखवली.
पुरुष गटातील सामनेही जोरदार झाले. नंदकुमार क्रीडा मंडळाने अमर ज्योतवर 34-27 असा विजय मिळवत जोरदार सुरुवात केली. निशांत मोरे आणि ओंकार खाडे यांनी दुसऱ्या सत्रात खेळाचा रंग पालटला आणि नंदकुमारला पहिला विजय मिळवून दिला.
उत्कर्ष क्रीडा मंडळ आणि विजय क्रीडा मंडळ यांच्यातील सामना तर अक्षरशः श्वास रोखणारा ठरला! शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या लढतीत सामना बरोबरीत संपल्यानंतर अलहिदा डावात उत्कर्षने 1 गुणाने बाजी मारली. त्याचप्रमाणे जय बजरंग मंडळानेही मुलुंड संघावर 8-5 अशी मात करत पुढची फेरी गाठली.
आदर्श, भवानीमाता, नवनाथ, गणेश क्लब यांची विजयी सलामी
मुंबई, दि. 15 (क्री. प्र.) – मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने, अरुण क्रीडा मंडळ आयोजित ‘ब’ गट कबड्डी स्पर्धेत आदर्श क्रीडा मंडळ, भवानीमाता, नवनाथ, गणेश क्लब या संघांनी विजयी सलामी दिली.
उद्घाटनाच्या लढतीत आदर्श क्रीडा मंडळाने नवजवान संघाचा 6 गुणांनी पराभव केला. पराभूत संघातून नरेश कदमने चढाईत आणि आशीष वाडकरने पकडीमध्ये चमकदार कामगिरी केली, परंतु संघाचा पराभव ते टाळू शकले नाहीत. दुसऱ्या सामन्यात भवानीमाता संघाने वीर संताजी संघाचा 23 गुणांनी दणदणीत पराभव केला. तिसऱ्या सामन्यात गणेश क्लबने गणेश कृपा संघाचा 10 गुणांनी पराभव केला. विजयी संघाकडून रोहित मोरे, प्रफुल पवारने दमदार खेळ केला.. किरण हुर्डे आणि राहुल पाटील संघाचा पराभव टाळू शकले नाही.





























































