
शहरातील जुनी एमआयडीसी परिसरात असलेल्या मुंदडा ट्रेडर्स या ॲल्युमिनियम कोटिंग आणि शीट निर्मिती करणाऱ्या उद्योगात आज, १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. तसेच कारखान्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक ई-१/२ व १/३/१ येथे कोटिंग प्रक्रियेचे काम सुरू असताना अचानक बॉयलरचा स्फोट झाला आणि कारखान्याला आग लागली. या स्फोटात दत्ता बुरांगे (रा. प्रकाश नगर, लातूर) आणि अभी कुमार (मूळ रा. उत्तर प्रदेश) हे दोन कामगार गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान दत्ता बुरांगे यांचा मृत्यू झाला. अभी कुमार यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी महापालिका आणि एमआयडीसी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सायंकाळी ६ वाजेपर्यंत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. सुदैवाने, या स्फोटामुळे परिसरातील इतर कोणत्याही औद्योगिक युनिटला हानी पोहचली नाही.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन महापालिका उपायुक्त पंजाबराव खणसोळे आणि अग्निशमन अधिकारी जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. स्फोटाचे नेमके कारण शोधण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत फॉरेन्सिक तपासणी पथकाला पाचारण करण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून स्फोटाचा सखोल तपास केला जात आहे.



























































