Ratnagiri News बोगस आणि निकृष्ट कीटकनाशक औषधे, खतांमुळे आंबा-काजू संकटात; कोकणातील बागायतदार लढा उभारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bogus-pesticides-fertilizers-ruin-konkan-mango-cashew-crops-ratnagiri-meeting-saturday

बोगस आणि निकृष्ट कीटकनाशक औषधे, खतांचा वापर केल्याने कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बोगस कीटकनाशक औषधे आणि खतांविरोधात आंबा-काजू बागायतदारांनी आवाज उठवला आहे. बागायतदारांच्या फसवणुकी विरोधात एक लढा उभारला जाणार असून त्याची दिशा शनिवार, १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता नाचणे येथील बालाजी मंगल कार्यालयातील सभागृहात होणाऱ्या आंबा-काजू बागायतदारांच्या मेळाव्यात ठरणार आहे.

कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादके विक्रेते सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश साळवी आणि रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बाळ माने यांनी आंबा-काजू बागायतदारांच्या मेळाव्याचे आयोजन करत बागायतदारांमध्ये एकजूटीची ताकद निर्माण केली आहे. या मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी खासदार विनायक राऊत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी मार्गदर्शन करणार आहेत.

कारवाईची मागणी

आंबा-काजू बागायतदारांना बोगस किटकनाशक औषधे दिली गेली आहेत. बोगस खतांमुळे बागायतदारांची फसवणूक झाली आहे. कृषी विभागाने योग्य नियंत्रण न ठेवल्याने आज बागायतदार अडचणीत सापडला आहे. अशा बोगस-निकृष्ट कीटकनाशक औषधे आणि खते देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणी या मेळाव्यात होणार आहे. तसेच हवामानातील बदलामुळे आंबा आणि काजू उत्पादनात प्रचंड घट झाली आहे त्यामुळे बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे आंबा-काजू बागायतदारांना सरकारने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. या करिता सरकारला जाग आणण्यासाठी कोकणातील बागायतदार लढा उभारणार असून त्याची दिशा या मेळाव्यात ठरणार आहे.

सतत नुकसान

गेल्या काही वर्षात कोकणातील आंबा आणि काजू उत्पादन हवामानातील बदलामुळे संकटात सापडले आहे. अवकाळी पाऊस, प्रचंड तापमान आणि वादळ आंबा व काजू फळपीकाचे सातत्याने नुकसान होत आहे. उत्पादनावर होणारा खर्च आणि मिळणारा भाव यांची सांगड बसत नसल्याने काही आंबा बागायती करणे सोडून दिल्याची गंभीर बाबी समोर येत आहेत.