
दैनिक ‘सामना’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत मंदिर समिती प्रशासनाला जाग आली असून, गेल्या अनेक दिवसांपासून धूळखात पडून असलेल्या बॅटरी कार अखेर भाविकांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. उन्हाच्या तीव्र झळा आणि 42 अंश सेल्सिअस तापमानामुळे हैराण झालेल्या वृद्ध, अपंग आणि बाल भाविकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
पंढरपुरात सध्या उन्हाचा पारा 42 अंशांवर पोहोचला आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर परिसरातील प्रमुख मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत. रुग्णवाहिका वगळता अन्य कोणत्याही वाहनांना, अगदी मंत्र्यांच्या गाड्यांनाही या परिसरात प्रवेश नाकारला जातो. यामुळे भाविकांना आपली वाहने लांबच्या पार्किंगमध्ये उभी करून अनवाणी किंवा चालत मंदिराकडे यावे लागते. या प्रखर उन्हात होणारी भाविकांची ससेहोलपट लक्षात घेऊन काही दानशूरांनी मंदिर समितीला बॅटरी कार भेट दिल्या होत्या.
पार्किंगपासून मंदिरापर्यंत भाविकांना सुखकर प्रवास करता यावा, हा या कार देण्यामागचा मुख्य हेतू होता. मात्र, मंदिर समितीने या गाड्या वापरात न आणता पार्किंगमध्येच सडत ठेवल्या होत्या. या निर्लज्ज कारभारावर दैनिक ‘सामना’ने प्रकाश टाकताच प्रशासकीय यंत्रणा हलली. बातमी प्रसिद्ध होताच अवघ्या 24 तासांच्या आत या बॅटरी कार मंदिर परिसरात धावू लागल्या आहेत. सध्या ‘श्रीकृष्ण मंदिर ते नामदेव पायरी’ आणि ‘महाद्वार चौक ते नामदेव पायरी’ अशा दोन मार्गांवर ही सेवा सुरू करण्यात आली असून भाविकांनी या सेवेचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे.
पंढरपूर मधील उन्हाचा पारा 42 डिग्रीवर पोहचला आहे. तळपत्या उन्हात विठुमाऊलीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविकांची वर्दळ आहे. अशातच, दैनिक ‘सामना’ ने दणका देताच मंदिर समिती व्यवस्थापनाला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली. धूळखात पडून असलेल्या बॅटरी कार भाविकांच्या सेवेत दाखल झाल्या. pic.twitter.com/2zmJaHbSuL
— Saamana Online (@SaamanaOnline) April 16, 2026
“विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारा सामान्य भाविक सोयीसुविधांबाबत तक्रार करत नाही, याचा अर्थ समितीने त्यांना वाऱ्यावर सोडावे असा होत नाही. ‘सामना’ने हा प्रश्न लावून धरला नसती तर वारकऱ्यांना या कडाक्याच्या उन्हात पायपोळत चालावे लागले असते. समितीने आता तरी मानवतेच्या दृष्टिकोनातून सुविधांकडे लक्ष द्यावे.” – बाबा शिरुरकर (भाविक), घोडनदी
या संदर्भात मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांनी सांगितले की, “नादुरुस्त असलेल्या कार दुरुस्त करून आजपासून सेवेत दाखल केल्या आहेत. तसेच, वाळवंटातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी जुना सोलापूर रोड ते महाद्वार घाट (पुंडलिक मंदिर) या मार्गावरही दोन कार सुरू करण्याबाबत संबंधित कंपनीशी चर्चा सुरू आहे.”




























































