मीरा-भाईंदर, वसई-विरारला धो धो पाणी; धामणी गावकऱ्यांच्या डोळ्यांत मात्र ‘पाणी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धामणी धरण हाकेच्या अंतरावर असूनही गावकऱ्यांना पाणी नाही अशी विरोधाभासी परिस्थिती सध्या डहाणू तालुक्यातील धामणी-आंबेघर परिसरात आहे. वसई-विरार आणि मीरा-भाईंदर महापालिकांना धो धो पाणी मात्र धामणी परिसरातील गावांना पाणीटंचाईचे भीषण चटके बसत आहेत. धरण तुडुंब भरलेले असतानाही जलजीवन योजनेचे बारा वाजल्यामुळे ग्रामस्थांच्या हंड्यात नाही तर डोळ्यात ‘पाणी’ तरळत आहे.

धामणी-आंबेघर ग्रामपंचायत हद्दीतील गावपाड्यांमध्ये सतराशेहून अधिक लोकसंख्या आहे. उन्हाच्या झळा वाढू लागताच विहिरी व बोअरवेल पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दररोज दोन-तीन किमीची पायपीट करावी लागत आहे. काही ठिकाणी थोडेफार पाणी उपलब्ध असले तरी ते दूषित असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची भीती आहे. डहाणू, विक्रमगड आणि जव्हार या तीन तालुक्यांच्या सीमेलगत असलेल्या या भागात दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीत पाणीटंचाई तीव्र होते. सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी धरणातून बोईसर-तारापूर एमआयडीसी तसेच वसई-विरार आणि मीरा-भाईंदर शहरांना मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा केला जातो. मात्र धरणाच्या शेजारील गावांनाच पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पाण्यासाठी डोंगरदऱ्यांतून भटकंती
केंद्र सरकारची ‘हर घर नल’ जलजीवन मिशन योजना या भागात अद्याप पूर्णपणे कार्यान्वित झालेली नसून तिचे काम अर्धवट आहे. अनेक ठिकाणी विहिरीची कामे अपूर्ण आहेत, तर पाईपलाईनदेखील अर्धवट खोदून ठेवल्या आहेत. त्यामुळे स्थानिकांना पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्रतेने सहन कराव्या लागत आहेत. ‘दिवसभर शेतात काम करून संध्याकाळी घरी आल्यानंतर पाण्यासाठी डोंगरदऱ्यातून लांब अंतर चालत जावे लागते. ग्रामपंचायतीने बोअरवेल केल्या, पण त्यातून पाणी मिळत नाही. पाणीपुरवठा योजना अपूर्ण असल्याने महिलांचे हाल होत आहेत,’ अशी व्यथा रेखा हन यांनी व्यक्त केली.