
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी केंद्र सरकारच्या प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना (delimitation) निर्णयाविरोधात गुरुवारी आंदोलन केले. त्यांनी या विधेयकाची प्रत जाळत काळा झेंडा फडकावला आणि राज्यव्यापी आंदोलनाची औपचारिक सुरुवात केली.
केंद्र सरकारकडून गुरुवारपासून तीन दिवसांच्या विशेष संसदीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. याच अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयकही सादर करण्यात आले आहे. काळे कपडे परिधान करून स्टॅलिन यांनी या विधेयकाविरोधात निषेध नोंदवला. या विधेयकानुसार लोकसभा आणि राज्य विधानसभांची रचना व आकार बदलण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव आहे. स्टॅलिन यांनी या विधेयकाला “काळा कायदा” असे संबोधत त्याची प्रत जाळली.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत त्यांनी तामिळनाडूमध्ये व्यापक आंदोलन उभारण्याचे आवाहन केले. “तमिळनाडूमध्ये प्रतिकाराची लाट उसळू दे. फॅसिस्ट भाजपचा अहंकार कोसळू दे,” असे ते म्हणाले. त्यांनी याआधीच्या हिंदीविरोधी आंदोलनाचा संदर्भ देत, तमिळनाडूच्या लढ्यामुळे दिल्लीला माघार घ्यावी लागली होती, असे सांगितले. तसेच या विधेयकामुळे “तमिळ लोकांना त्यांच्या स्वतःच्या भूमीत निर्वासित बनवले जाईल,” असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, 2011 च्या जनगणनेवर आधारित मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रस्तावाला विरोध वाढत आहे. केंद्र सरकारने ‘नारी शक्ती वंदन अधिनियम, 2023’ अंमलात आणण्यासाठी मसुदा दुरुस्ती विधेयकांना मंजुरी दिल्यानंतर हा वाद अधिकच तीव्र झाला आहे. निवडणूक काळातच विशेष अधिवेशन बोलावल्याबाबतही विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे.
स्टॅलिन यांनी राज्यातील नागरिकांना आपल्या घरांवर काळे झेंडे लावून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानुसार तिरुचिरापल्ली येथील थेन्नूर भागात मंत्री अनबिल महेश पोय्यामोझी यांच्या निवासस्थानी काळे झेंडे फडकवण्यात आले.
केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार लोकसभेची संख्या 543 वरून 850 पर्यंत वाढवण्याचा विचार आहे. त्यापैकी 815 जागा राज्यांसाठी आणि 35 जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी असतील. तसेच 2029 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी महिला आरक्षण लागू करण्यासाठी 2023 च्या कायद्यात दुरुस्ती करून 2027 च्या जनगणनेपासून मतदारसंघ पुनर्रचनेला वेगळे करण्याचा विचारही आहे.
#Delimitation: தமிழ்நாடெங்கும் எதிர்ப்புத் #தீ_பரவட்டும்!
பாசிச பா.ஜ.க.வின் ஆணவம் வீழட்டும்!
🔥 அன்று, தமிழ்நாட்டில் பற்றத் தொடங்கிய இந்தி எதிர்ப்புத் தீ டெல்லியைச் சுட்டெரித்தது. டெல்லி பணிந்த பின்பே எங்கள் தீ தணிந்தது!
🔥 இன்று, தமிழரைச் சொந்த நாட்டில் அகதிகளாக்கும்… pic.twitter.com/aSsOLN7K6J
— M.K.Stalin – தமிழ்நாட்டை தலைகுனிய விடமாட்டேன் (@mkstalin) April 16, 2026





























































