
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर बोलताना या निर्णयाला राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. देशाच्या अर्ध्या लोकसंख्येशी संबंधित इतक्या महत्त्वाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणे हे सर्वांसाठी भाग्याची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकसभेत भाषण करताना मोदी म्हणाले की, “आपण सर्वजण नशीबवान आहोत की देशाच्या अर्ध्या लोकसंख्येशी संबंधित राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. हे ऐतिहासिक संधी हातातून जाऊ देऊ नये.” त्यांनी पुढे सांगितले की, देशातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येत देशाला नवी दिशा देण्याची वेळ आली आहे. शासन व्यवस्थेत अधिक संवेदनशीलता आणण्याचा हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांनी या विधेयकाचा देशाच्या राजकारणावरच नव्हे, तर देशाच्या दिशा आणि दशेवरही दूरगामी परिणाम होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. महिला आरक्षणामुळे निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढेल आणि त्यामुळे शासन अधिक समतोल व सर्वसमावेशक बनेल, असे त्यांनी सांगितले.
देशाच्या 50 टक्के लोकसंख्येचा धोरणनिर्मितीत सहभाग असणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. महिला आरक्षण विधेयक हे त्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगत त्यांनी सर्व पक्षांनी या प्रक्रियेला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.





























































