मुंबई-पुणे महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ अंतिम टप्प्यात, ‘महाराष्ट्र दिनी’ वाहतूक सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘मिसिंग लिंक’चे काम पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहे. ‘मिसिंग लिंक’वरील वाहतूक ‘महाराष्ट्र दिनी’ म्हणजेच 1 मेपासून सुरू करण्याचे प्रयत्न महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) केले जात आहे. याच अनुषंगाने सध्या ‘मिसिंग लिंक’वर अंतिम चाचण्या करण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासात 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील जिवघेण्या वळणांवर वारंवार अपघात होतात. खंडाळा एक्झिटपासून खोपोलीपर्यंतचा भाग तीव्र उताराचा आहे. त्यामुळे हा भाग अपघातांच्या दृष्टीने ‘ब्लॅक स्पॉट’ बनला आहे. वाढते अपघात आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर ‘मिसिंग लिंक’ प्रभावी उपाय ठरणार आहे. आधुनिक बांधकामाचा उत्कृष्ट नमुना ठरणारा हा मार्ग ‘महाराष्ट्र दिनी’ वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन एमएसआरडीसीने केले आहे. ‘मिसिंग लिंक’च्या माध्यमातून लोणावळा आणि खंडाळा घाट टाळून थेट बोगदा तयार केला आहे. त्यामुळे वाहनधारकांना वळणावळणाच्या घाटातून जाण्याची गरज नाही. सरकारकडून लोकार्पणाची वेळ मिळणे बाकी आहे. मात्र ’महाराष्ट्र दिना’चा मुहूर्त डोळय़ासमोर ठेवून 30 एप्रिलपूर्वी सर्व काम व अंतिम चाचण्या पूर्ण करण्याचे उद्दिष्ट एमएसआरडीसीने ठेवले आहे. तूर्तास ‘मिसिंग लिंक’ची एक मार्गिका सेवेत दाखल केली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

13.3 किमी लांबीची नवीन मार्गिका
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक ही खोपोली ते पुसगावदरम्यान 13.3 किलोमीटर लांब आहे. नव्या मार्गिकेच्या कामावरून अखेरचा हात फिरविण्यात येत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग 24 वर्षांपूर्वी, 2002 मध्ये वाहतुकीसाठी सेवेत दाखल झाला होता. राज्यातील इतर महामार्गांच्या तुलनेत हा महामार्ग सर्वाधिक वर्दळीचा ठरला असून दररोज 70 हजारांहून अधिक वाहने येथून ये-जा करतात. वाढत्या वाहन संख्येचा विचार करीत एमएसआरडीसीने महामार्गाचे दहा पदरीकरण करण्यासह मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेतला.